स्पर्श अगंबाई चा
मूळ संकल्पना अतिशय हिट ठरली की त्यावर सिक्वेल काढायची परंपरा हिंदीप्रमाणेच मराठीत येऊ लागली आहे. पहिल्या चित्रपटाची लोकप्रियता बघता सिक्वेल काढणे आर्थिक दृष्टया कमी जोखमीचे त्यामुळे त्यात मराठी सिनेमा ही मागे नाही झपाटलेला २, टाईपास २ आणि सध्या आलेला अगंबाई अरेच्या २ ही मराठी चित्रपटाची सिक्वेलस.
सिक्वेल म्हटलं की त्याची पहिल्या चित्रपटाशी बरोबरी होणं हे आलंचं त्यामुळे कादाचित आतापर्यंत सिक्वेल इतके हिट ठरले नसतील. अगंबाई अरेच्या २चा पहिल्या चित्रपटाशी काहीही संबंध नाही हे दिग्दर्शकाने आधीच स्पष्ट केले असले तरी प्रेक्षकांची करमणूक करण्यात तो तितकाच यशस्वी ठरतो. भरत जाधव , प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव ही आघाडीची पुरुष कलाकार मंडळी असताना पण सोनाली कुलकर्णीला केंद्र स्थानी ठेऊन चित्रपट मांडला आहे. स्त्री प्रधान चित्रपट बरेच वर्षांनी मराठीत आला आहे. 'शुभांगी कुडाळकर' ही चित्रपटाची मुख्य नायिका सोनाली कुलकर्णीने उत्तमरीत्या उभारली आहे.
'श्रीयुत गंगाधर टिपरे' या सुप्रसिद्ध मालिकेनंतर पुन्हा एकदा दिलीप प्रभावळकर आणि केदार शिंदे ही लेखक -दिग्दर्शक जोडी या चित्रपटानिमित्त एकत्र आली आहे. मुळकथा दिलीप प्रभावळकरांची असल्यामुळे अत्यंत साध्या गोष्टीमधून विनोद निर्मिती आपल्याला पहायला मिळते . कुटुंब -नातेसंबध या मधला गोडवा हा केदारचा असलेला स्पेशल टच या चित्रपटातही दिसून येतो. आजही लोकांच्या मनात घर करून असणाऱ्या अगंबाई अरेच्या १ च्या गाण्यांनी अजय-अतुल या संगीतकार जोडीने मराठी चित्रपटात पदार्पण केले होते तसेच निषाद या संगीतकाराने अगंबाई अरेच्या २ या चित्रपटामधून मराठी चित्रपटात उत्कृष्ट पदार्पण केले आहे. पहिल्या चित्रपटाशी बरोबरी न करता प्रेक्षकाने जर हा चित्रपट पहिला तर त्यांची नक्कीच निराशा होणार नाही.